‘हे’ तर मी ३० वर्षांपासून ऐकतोय ! : शरद पवारांचा शिवसेनेला टोला

0
47

नाशिक (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांवर एकहाती शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (मंगळवार) मातोश्रीवर झालेल्या सर्व जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत केले होते. यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. स्वबळावर भगवा फडकवणार हे मी गेल्या ३० वर्षांपासून ऐकत आलो आहे, त्यात नवीन काही नाही, असे त्यांनी म्हटले आहे. नाशिकच्या दौऱ्यावर गेलेल्या शरद पवार यांनी आज कांदा व्यापारी, शेतकरी, बाजार समितीच्या संचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पवार यांनी या वेळी अघोषित कांदा लिलाव बंदवर चर्चा केली. कांदा प्रश्नावर तोडगा काढा, केंद्र सरकारला स्टॉक लिमिट रद्द करण्याची विनंती करा, अशा मागण्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे केली. या वेळी पवार यांनी महाग कांदा वाण विकणाऱ्या सिड्स कंपनीविरुद्ध तक्रारीची दखल घेतली जाणार आहे. सरकार याची चौकशी करेल. केंद्र सरकारशी चर्चा करून तक्रार निवारण करू. मात्र, मार्केट बंद करू नका. शेतकऱ्यांचं जास्त नुकसान होऊ देऊ नका, असा सल्ला व्यापाऱ्यांना दिला.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाबाबत पवार म्हणाले की, शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार हे शिवसैनिकांना सांगत असेल. पण हे मी मागील ३० वर्षांपासून ऐकत आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या नेत्यांना आपला पक्ष मोठं करण्याचं स्वातंत्र्य आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवाव्या का ? हा निर्णय इतर संबंधित पक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील. मात्र, भाजपला दूर ठेवण्यासाठी आपण एकत्र आलो आहेत, हे महाविकास आघाडीतील नेत्यांनी विसरू नये. महाविकस आघाडी सरकारला राज्यातील जनतेची पसंती आहे. जनतेच्या भल्यासाठी निर्णय घ्या, असा सल्ला देखील शरद पवार यांनी यावेळी दिला.