मुंबई (प्रतिनिधी) : बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवूनही राज्यपाल निर्णय घेत नाहीत. म्हणजे नक्कीच त्यांचे मन साफ नाही. व १२ आमदारांच्या नियुक्त्या करू नका, असा त्यांच्यावर ‘वर’चा दबाव आहे. सरकारने १२ नावांची शिफारस करून आता आठवा महिना लागला. राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यांत हलणार आहे ?, हे राजभवनातील सुईणीने एकदा स्पष्ट करावे, असा टोला शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.

या लेखात पुढे म्हटले आहे की, राज्यपाल हे केंद्राचे ‘पॉलिटिकल एजंट’ म्हणजे गृहखात्याचे वतनदार आहेत, ही सोपी व्याख्या आम्ही सांगतो. राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांचं वर्तन घटनाविरोधी व राजकीय बोटचेपेपणाचे आहे. राज्यपाल त्यांच्या पितृपक्षाच्या दबावाखाली काम करीत असतील, तर पंतप्रधान मोदी यांनी घटनेची,  लोकशाहीची ही घसरगुंडी रोखायला हवी. राजभवनांचा वापर करून सत्तापरिवर्तन वगैरे होत नाही. व अफगाणिस्तानच्या अब्दुल गनी यांच्याप्रमाणे कोणी ‘सरेंडर’ही होत नाही, हे प. बंगाल व महाराष्ट्रात दिसून आले.

महाराष्ट्राचे राज्यपाल हा सर्वत्र चेष्टेचा विषय झाला आहे. पदाचे इतके अवमूल्यन व घसरगुंडी राज्यपाल साहेबांनी करून ठेवली आहे. राजभवनातील घडामोडींचे आता जनतेला व सरकारलाही काही वाटेनासे झाले आहे. राज्यपालांच्या अधःपतनास जितके ते स्वतः जबाबदार आहेत त्यापेक्षा जास्त राज्यातील त्यांचा पितृपक्ष भाजपा जबाबदार आहे,  असाही निशाणा  भाजपवर साधण्यात आला आहे.