मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच शिवसेना फोडली, असा आरोप करून शिवसेनेतून ५० आमदार का गेले, याचे उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन रामदास कदम यांनी केले. यावेळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळाला.

रामदास कदम म्हणाले, आपल्याला सल्ला द्यायचा मला अधिकार नाही, पण ५० आमदार पक्षातून का गेले, १२ खासदार का जात आहेत, याचे ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे. अजित पवारांनी डाव साधला आणि शिवसेनेच्या आमदारांना संपवण्याचा डाव आखला. राष्ट्रवादीच्या आमदारांना शिवसेनेच्या वाट्याचाही निधी मिळाला. त्यामुळेच एकनाथ शिंदे गटाने हे पाऊल उचलले, असा हल्लाबोल त्यांनी केला.

मागील काही दिवसांपासून रामदास कदम पक्षनेतृत्वावर नाराज होते. उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ते म्हणाले, १९७० पासून मी शिवसेनेत सक्रिय आहे. गेली ५२ वर्षे मी पक्षासाठी दिले. स्वप्नातही वाटले नव्हते की, या पदाचा कधी राजीनामा देईन. आम्ही उभे केलेले हे साम्राज्य पत्त्यासारखे कोसळताना पाहून वाईट वाटत आहे.

बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोध केला, त्याच पक्षाच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. तुम्ही शरद पवार, सोनिया गांधी यांना का सोडत नाहीत? आज बाळासाहेब असते, तर त्यांनी तुम्हाला हे करू दिले असते का? संपूर्ण बंडखोरीचा उद्धव ठाकरेंनीही विचार करावा. आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला रामदास कदम यांनी दिला. आई भवानीची, बाळासाहेबांची शप्पथ घेऊन सांगतो किरीट सोमय्यांना मी कधी बोललो नाही. अजित पवारांनी अडीच वर्षांत वाट लावून टाकली, असेही रामदास कदम म्हणाले.