नागपूर (प्रतिनिधी) : जनहिताचे मुद्दे उचलणं जशी आमची जबाबदारी आहे, तशी वृत्तपत्रांचीदेखील आहे. आम्ही वीजेबद्दल, शेतकरी, कोविडबद्दल बोललो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे, हे लक्षात आलं आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या टीकेवर पलटवार केला आहे. 

शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर  टीका केली आहे.  यावर उत्तर देताना फडणवीस यांनी पलटवार केला आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले की, अधिवेशनाचे काहीच फलित नाही, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची निराशा झाली आहे.  हे सरकार शेतकरीविरोधी, गरीबविरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप आहे. एक ना अनेक प्रश्न राज्याला भेडसावत आहेत. त्यावर बोलायचे नाही लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, हे विरोधी पक्षाला कधी कळणार, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.