आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यात कालपासून (बुधवार) तुफान पाऊस पडत असून सर्वच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे बहुतांश गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. गडहिंग्लज-आजरा मार्गावरील व्हिक्टोरिया पुलावरून वाहतूक बंद झाली असून आजऱ्याचा गडहिंग्लजशी सपर्क तुटला आहे.

आजअखेर ११५० मिमी पाऊस पडला असून तालुक्यातील साळगाव, किटवडे, हाजगोळी, भादवण, गजरगाव, शेळप हे सर्वच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सकाळपासून पावसाला प्रचंड जोर असून सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी-नाले व ओढे पात्राबाहेरून वाहात आहेत. परिसरातील शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. महागाव-आजरा मार्गावरील ओढ्याच्या पुलावरून पाणी आल्याने काही काळ वाहतूक बंद होती. अतिवृष्टीमुळे चित्री धरण ७८ टक्के भरले आहे. आज आजऱ्यात ८३ मिमी, मलिग्रे ६० मिमी, उत्तूर ८५ मिमी, गवसे १२५ मिमी पाऊस पडला आहे. आजअखेरचा हा सर्वाधिक पाऊस आहे.