राधानगरी तालुक्यास पावसाने झोडपले… : भोगावतीकाठी महापूरसदृश स्थिती

0
352
कोल्हापूर - राधानगरी मार्गावरील भोगावती कारखान्यासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

राशिवडे (प्रतिनिधी) : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यासह राधानगरी तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे भोगावती नदीकाठी महापूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राधानगरी धरणात ६४ टक्के पाणीसाठा असून वीजगृहामधून १४२५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पावसामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहात असल्याने रस्त्यावर पाणी आले आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे. येळवडे, घोटवडे, भोगावती, कुरुकली, म्हाळुंगे या ठिकाणी रस्त्यावर ओढ्याचे पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

नदीपेक्षा नाल्यांचे पाणी रस्त्यावर येण्याचे प्रमाण मोठे आहे. दुपारी एक वाजेपर्यंत तुळशी धरण क्षेत्रात 232 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर दुपारी दोनपर्यंत राधानगरी धरणामध्ये ७० टक्के पाणीसाठा झाल्याची नोंद आहे. धुवाधार पावसाबरोबरच जोरदार वारेही सुटल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. राशिवडे येथे परिते रोडवर मोठे झाड कोसळून रस्ता बंद झाला होता, पण ग्रामस्थांनी तत्परतेने झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे