कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी खासदार राजू शेट्टी करीत असलेली वक्तव्ये गैरसमजुतीने आहेत. किंबहुना त्यांच्यासारख्या एका जबाबदार नेत्याला ती शोभणारी नाहीत, असे प्रत्युत्तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. जबाबदार नेता म्हणून काम करीत असताना दुसऱ्यांना शिव्या-शाप देणे, चिखलफेक करणे व नाहक आरोप करणे बरे नव्हे, असेही त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या पत्रकात मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे की, एका कार्यक्रमात पत्रकारांनी मला विचारले की,  तुमची विनंती माजी खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळली असून ते मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. एवढेच नाही तर पायातील हातात घ्या, असेही वक्तव्य केले आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय? त्यावेळी मी, अलिकडच्या त्यांच्या सर्व वक्तव्यावरुन त्यांनी दिशा बदलल्याचे सांगितले.  आमच्यामध्ये व स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये चांगले संबंध असताना अचानक अशी वक्तव्ये का ? याचे आश्चर्य आम्हाला होते.

माजी खासदार शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून आमदार, खासदार झाले, तसे बाकीचे झाले नाहीत. आमची प्रतिमा बनवण्यासाठी अनेक वर्षे लागली आहेत. वक्तव्ये करताना कोणाचा अपमान होणार नाही, मने दुखावणार नाहीत, याची दखल नेत्यांनी घ्यावयास हवी. राजकारणामध्ये चढउतार येत असतात. परंतु; दुसऱ्याला शिव्या- शाप देऊन परिस्थिती बदलत नसते. पायातील हातात घ्या, हे वाक्य फारच चुकीचे होते. आमचे नेते शरद पवारसाहेबांचा उल्लेखही अनाठायी होता.