मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला शो ‘केबीसी १३’ सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या शोमध्ये हॉट सीटवर रेल्वे अधिकारी देशबंधू पांडे बसले होते. परंतु आता त्यांना रेल्वे प्रशासनाने चार्जशीट दिली आहे. त्यांच्या वेतनवाढीवर तीन वर्षांसाठी बंदी घातली आहे. कोणतीही माहिती न देता गायब होणे आणि केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्व माहिती न देणे, असे त्यांच्यावर आरोप केले आहेत.  

पांडे राजस्थानच्या कोटा रेल्वे विभागाच्या स्थानिक विभागाचे कार्यालय अधीक्षक आहेत. ते रजा मंजूर झाल्याशिवाय ९ ते १३ ऑगस्टपर्यंत बेपत्ता होते. त्यांचे असे वागणे कामाकडे दुर्लक्ष करण्यासारखे असल्याचे चार्जशीटमध्ये म्हटले आहे.

देशबंधू यांनी केबीसीमध्ये बुद्धिमत्तेच्या जोरावर ३ लाख २० हजार रुपये इतकी रक्कम जिंकली. तर दुसरीकडे मुंबईहून परत येताच पुढील ३ वर्षे त्यांच्या वेतन वाढीवर प्रशासनाने बंदी घातली आहे. देशबंधू पांडे सहभागी झालेले एपिसोड २६ आणि २७ ऑगस्ट रोजी प्रसारित झाला आहे. त्यांनी केबीसीमध्ये १० प्रश्नांची योग्य उत्तरे दिली.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने केलेल्या या कारवाईला कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. रेल्वे प्रशासन देशबंधू पांडे यांच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात खटला लढला जाईल, असे पश्चिम मध्य रेल्वे मजदूर संघाचे विभागीय सचिव खालिद यांनी म्हटले आहे.