फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणणे जड जातंय : राऊत

0
34

मुंबई (प्रतिनिधी) : ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणणे मला अजूनही जड जात आहे.’ असे म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडून अनपेक्षितरीत्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, तर दुसरीकडे त्यांच्याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सहभागी होण्यास त्यांच्याच केंद्रीय नेतृत्वाने भाग पाडले. ज्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे. असे असताना आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी याच मुद्द्यावर फडणवीसांना डिवचले आहे. तसेच काहीसे चुचकारण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

एक तर माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री आपण त्यांना बोलत आलो आहोत. पण उप हा शब्द त्यांच्या मागे लावायला फार जड जात आहे. तरी मी म्हणेन की, देवेंद्रजींच्या संदर्भात जे काही झाले असेल, तर तो त्यांच्या पक्षातील प्रश्न आहे.’

‘कोणाला आनंद वाटेल का? जे मुख्यमंत्री पदाच्या तयारीत बसले आहेत, नवीन सरकार स्थापन होत आहे, विधिमंडळ पक्षाची बैठक होते आहे आणि त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे पद स्वीकारा असा आदेश दिला जातो. ते देखील जे आता मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांच्या मंत्रिमंडळात ज्युनिअर मंत्री होते; पण भाजपमध्ये शिस्त आणि आदेश याचे पालन केले जाते. त्यानुसार ते वागले.’ असे संजय राऊत म्हणाले.

मी बेडरपणे ईडीसमोर गेलो. मलाही मार्ग होता गुवाहटीला जाण्याचा, तसे प्रयत्नही झाले; पण मी नाही गेलो. मी बाळासाहेब, उद्धव ठाकरे, शिवसेना यांच्या बरोबर राहिलो. स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या आणि अशा पद्धतीने वागायचे हे आमच्या रक्तात नाही. ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले आहे, असेही राऊत म्हणाले.