कागल (प्रतिनिधी) : शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राजे विक्रमसिंह घाटगे राज्यस्तरीय हॉलीबॉल चषक स्पर्धेत इस्लामपूर व्यायाम मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत १४ संघ सहभागी झाले. राजे समरजितसिंह घाटगे व युवराज आर्यवीरराजे घाटगे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण झाले.

या स्पर्धेत दुसरा क्रमांक श्री स्पोर्ट्स क्लब कुरुंदवाड, तर तृतीय क्रमांक पैलवान अमोल बुचडे फाउंडेशन पुणे यांनी पटकाविला. उत्तेजनार्थ संघासाठीचे बक्षीस  निपाणीच्या बालवीर स्पोर्ट्सने मिळविले. उत्कृष्ट सेंटर प्लेयर कुरुंदवाडचा आदित्य कडगावे, उत्कृष्ट अटॅकर पुण्याचा प्रीतम खोत, तर सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून इस्लामपूरचा राजवैभव भांगर यांना गौरविले.

कोल्हापूर जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने भारतीय हॉलीबॉल महासंघाचे सचिव बाळासाहेब सूर्यवंशी व जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे सचिव सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा झाल्या. सांगली, सातारा, इस्लामपूर, पुणे, कुरुंदवाड, निपाणी, उंब्रज, कागल, निगवे, इंगळी, मुरगूड, लिंगनूर, जयसिंगपूर येथील संघ स्पर्धेत सहभागी झाले.

पंच म्हणून महेश शेडबाळे, शहनवाज मोमिन, विनोद रणवरे, योगेश वराळे, कपिल खोत, अनिल देवडकर, दीपक चव्हाण, मारुती काशिद, संजय पाटील, प्रवीण मोरबाळे आदींनी काम पाहिले. सुनील गायकवाड यांनी सामन्यांचे समालोचन केले. अश्विनकुमार नाईक, के. बी. चौगुले, बाळासो जाधव, संजय हजारे, शिवानंद चौगुले आदींनी संयोजन केले.