शरद पवार गृहमंत्री की मुख्यमंत्री आहेत..? : भाजप नेत्याचा निशाणा  

0
179

मुंबई (प्रतिनिधी) : पाठीमागून सूत्रे हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी, असा उपहासात्मक सल्ला  भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिला आहे.  त्यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री?  राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे,  असेही अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांनंतर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात  आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. शरद पवारांनीही तक्रार गंभीर असून पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे म्हटले आहे. यादरम्यान शरद पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याच्या वृत्तावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.