सचिन वाझे आपला जावई आहे का ? : विधान परिषदेत विरोधक आक्रमक

0
18

मुंबई (प्रतिनिधी) : मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी विरोधकांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. या मुद्द्यावरुन विधानसभेत गेल्या दोन दिवसांपासून  गदारोळ  झाला. तर आज (बुधवार)  विधान परिषदेतही हा मुद्दा उपस्थित केला.  विधान  परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सचिन वाझे आपला जावई आहे का ? अशी विचारणा करत सभापती निलम गोऱ्हेंसमोर संताप व्यक्त केला. तसेच वाझे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंनी पतीचा खून केल्याचा संशय व्यक्त केला आहे. प्रथमदर्शनी अनेक पुरावे समोर येत आहेत. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी पत्नीचा जबाब सांगितला तरी सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहे,  असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

मनसुख हिरेन प्रकरणात ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या नष्ट करण्यासाठी सरकार संधी देत आहे. राज्यातील जनतेचा सरकावर विश्वास राहिलेला नाही. कोण लागून गेला सचिन वाझे? तुमचा जावई आहे का सभापती महोदय? का हे सरकार पाठीशी घालत आहे?, असा संतप्त सवाल दरेकर यांनी केला. पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला जात आहे, असा आरोप करून वाझेंना अटक करण्याची मागणी केली.