मुंबई (प्रतिनिधी) : ज्या व्यापारांचा मराठी पाटीला विरोध आहे, त्यांना एकच प्रश्न आहे. पाटी बदलण्याचा खर्च जास्त आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा?, असा सूचक इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत दिला आहे.

राज्य मंत्रिमंडळाने दुकानावरील नामफलक मराठीतच असावेत, असा निर्णय बुधवारी घेतला आहे. तर दुसरीकडे व्यापारी मात्र या निर्णयाला विरोध करत आहेत. या व्यापाऱ्यांना आता मनसेने इशारा दिला आहे.

दरम्यान, दुकानांवरील मराठी पाटय़ा लावताना शोधल्या जाणाऱ्या पळवाटा रोखत मराठी पाटय़ा सक्तीचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. यावरून राज्यात मनसे आणि शिवसेनेत श्रेयवाद सुरू झाला आहे. यावर दुकानांवरील मराठी पाटय़ांचे श्रेय इतर कोणी लाटू नये. ते श्रेय फक्त मनसेचे व मनसे कार्यकर्त्यांचे आहे, असे  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर यावरून शिवसेना आणि मनसेत श्रेयवाद वाढण्याची चिन्हे आहेत.