कागल (प्रतिनिधी) : छ. शाहू साखर कारखान्याच्या मानधनधारक मल्लांनी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल त्यांचा चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते सत्कार केला. यामध्ये कुस्तीगीर सृष्टी भोसले, ऋतुजा संकपाळ, सोहम कुंभार यांचा समावेश आहे.

गोंडा उत्तरप्रदेश येथे झालेल्या सिनियर राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत  महिला कुस्तीगीर सृष्टी भोसलेने ६२ किलो वजन गटात कांस्य पदक पटकावले. सातारा येथे झालेल्या २३ व्या वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. तसेच बेल्लारी कर्नाटक येथे झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदकाची मानकरी ठरली होती.

महिला कुस्तीगीर ऋतुजा संकपाळने सातारा येथे झालेल्या २३ व्या वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. तसेच इतर मानधनधारक कुमार कुस्तीगीर सोहम सुनिल कुंभार याने झारखंड येथे झालेल्या १५ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत  कांस्यपदक पटकाविले. तर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळविले आहे.