कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज यांचे नातू आणि शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे पुत्र छ. संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या नावाने वसविण्यात आलेल्या टोप संभापूर येथील त्यांच्या समाधी मंदिराला भेट देऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (रविवार) अभिवादन केले.

करवीरचे छ. संभाजी महाराज यांनी इ.स. १७१४ ते इ.स.१७६० पर्यंत तब्बल ४६ वर्षे राज्य केले. इ.स. १७१८ च्या सुमारास कोट, कोल्हापूर, पन्हाळा, राजापूर, नरगुंद, तोरगल, कोपल, तारळे, आजरे, बेळगाव आणि कुडाळ अशा १० सुभ्यासह एकूण ४६ किल्ले त्यांच्या ताब्यात होते.

तब्येतीच्या कारणास्तव एका लढाईतून करवीरला परतत असताना टोप नजीकच्या माळावर छ. संभाजी महाराज कैलासवासी झाले. महाराजांच्या पत्नी छ. महाराणी साहेब यांनी महाराजांचे हे समाधी मंदिर १७६४ साली बांधले. या मंदिराच्या पूजेअर्चेसाठी आणि देखभालीसाठी मानकरी नेमले गेले आणि येथेच गाव वसविले. त्यामुळे गावाचे नाव ‘संभापूर’ ठेवले. या समाधीस्थळाला पालकमंत्री पाटील यांनी भेट देऊन अभिवादन केले.