“धनंजय माने इथेच राहतात का ?’’

‘अशी ही बनवाबनवी’ची गौरवशाली ३१ वर्षे !

0 885

कोल्हापूर (विवेक जोशी) : घरमालक आपल्या भाडेकरूच्या खोलीत सकाळी सकाळी येतात. त्या खोलीत दोन्ही भावांबरोबर तिसऱ्या तरुणाला पाहून विचारतात, “हा कोण ?”  बेरक्या भाडेकरू सांगतो, “हा माझ्या भावाचा मित्र आहे, सकाळी सकाळी अभ्यासाला आलाय.” तर चौथा तरुण घरमालकाच्या मागून हळूहळू दरवाजाकडे सरकतो. दरवाजाच्या मागे लपतो. घरमालक आपल्या मित्राशी बोलण्यात गुंग असल्याचे पाहून पुन्हा दरवाजातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा घरमालकाचे त्याच्याकडे लक्ष जाते. प्रसंगावधान राखून तो उघड्या दरवाजावर चार-पाच वेळा टकटक करतो आणि भांबावलेल्या स्वरात विचारतो, “धनंजय माने इथेच राहतात का ?’’ आणि संपूर्ण थिएटरभर हास्यकल्लोळ उसळतो. हा अत्यंत गाजलेला सीन आहे ‘अशी ही बनवाबनवी’ या सुपरहिट मराठी चित्रपटातील. आज २३ सप्टेंबर. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल ३१ वर्षे झाली आहेत, मात्र अजूनही या चित्रपटाने मराठी चित्रपट रसिकांवर केलेले गारुड कायम आहे.

सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या विनोदी चित्रपटाने लोकप्रियतेचे उच्चांक मोडले असले तरी  या चित्रपटाला एक पार्श्वभूमी आहे. शैक्षणिकदृष्ट्या पुणे शहर स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुढारलेले आहे.  २३ सप्टेंबर १९८८ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला त्या वेळी पुणे औद्योगिकदृष्ट्याही पुढारलेले होते. त्यामुळे मुंबईनंतर पुण्याकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण नोकरीसाठी येत होते. त्यांना भाड्याने घरे हवी असत. मात्र पुणेकरांची ‘चिकित्सक’ वृत्ती आडवी येत असे. भाडे परवडणारी घरे पाहिजे असतील तर शहरापासून दूर जावे लागत असे. ही समस्या केंद्रस्थानी ठेवून भाड्याने घर मिळण्यासाठी काय काय युक्त्या वापराव्या लागतात, हे अत्यंत विनोदी पद्धतीने सचिन यांनी अप्रतिमरीत्या पडद्यावर पेश केले.

किरण शांताराम यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. सचिन, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, नवोदित सुशांत रे (जो हिंदी चित्रपटसृष्टीत ‘सिद्धार्थ’ या नावाने नावारूपास आला), सुधीर जोशी, सुप्रिया, निवेदिता जोशी, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, विजू खोटे, नयनतारा, सुहास भालेकर, लता थत्ते, मधु आपटे अशी जबरदस्त स्टारकास्ट यामध्ये होती. धमाल प्रसंग, वसंत सबनीस यांचे भन्नाट विनोदी संवाद, सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचे अफलातून टायमिंग आणि शांताराम नांदगावकर यांच्या गाण्यांना अरुण पौडवाल यांनी दिलेले सुमधुर संगीत या मुळे  हा चित्रपट मराठीत ‘मैलाचा दगड’ ठरला.

आम्ही त्या वेळी नुकतेच कॉलेजला जाऊ लागलो होतो, त्या वेळी सर्व मित्रांमध्ये याच चित्रपटाची चर्चा होती. सांगलीतील ‘स्वरूप’ हे मोठे चित्रपटगृह. या चित्रपटाची तिकिटे त्या वेळी चक्क काळ्या बाजारात विकली जात होती, हे सांगितले तर खोटे वाटेल. त्याची माऊथ पब्लिसिटी इतकी झाली होती की आम्हीही काळ्या बाजारात तिकिटे घेऊन ‘स्वरूप’मध्ये हा चित्रपट पाहिला. एवढी वर्षे उलटली तरी या चित्रपटाची जादू आजही कमी झालेली दिसत नाही. मराठी चित्रपटाच्या इतिहासात क्वचित एखाद्या चित्रपटाला असे भाग्य लाभले आहे. मराठी माणूस मग तो सामान्य व्यक्ती असो वा सचिन तेंडुलकर असो, हा चित्रपट या सर्वांच्या आवडीचा विषय आहे. आजच्या इन्टरनेटच्या जमान्यातही हा चित्रपट सध्याच्या युवा पिढीला तितकाच प्रिय आहे, जितके सध्या लोकप्रिय असलेले नवे चित्रपट.

Courtesy : You Tube

 

त्या काळात या चित्रपटाने सुमारे ३ कोटींचा व्यवसाय केला होता. आजच्या काळानुसार याचा हिशोब केला तर याचा व्यवसाय १०० कोटी रुपये झाला असे म्हणता येईल. सचिन यांनी वेळोवेळी दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाबद्दलचे किस्से सांगितले आहेत.  ते म्हणतात, त्यांना या चित्रपटाच्या यशाबद्दल प्रचंड विश्वास होता. तो इतका की, चित्रपट सिल्व्हर ज्युबिली झाल्यावर जे सन्मानचिन्ह देतात ते त्यांनी चित्रपटाचे चित्रीकरण अंतिम टप्प्यात असताना त्या वेळीच बनवून घेतले होते.

याच चित्रपटातील अनेक प्रसंग समाजमाध्यमांवर वापरले जातात. ही या चित्रपटाच्या लोकप्रियतेचीच पावतीच आहे. त्यामुळेच म्हणावेसे वाटते,  ‘असा चित्रपट पुन्हा निर्माण होणे नाही..!

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More