मुंबई (प्रतिनिधी) : औरंगाबादच्या नामांतरावरून राजकीय वातावरण तापले असताना शिवसेनेने पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचले आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. त्यास काँग्रेसने मोठा विरोध केला आहे. तर या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेची कोंडी केली आहे. यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय?, असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी  काँग्रेस नेत्यांना केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

खा. सावंत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८८ मध्ये औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर अशी घोषणा केली होती. तेव्हापासून हा लढा सुरु आहे. शासनाकडून यापूर्वीच मान्यता मिळायला हवी होती. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. पण आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे पुन्हा एकदा ही मागणी पुढे आली आहे. कोरोनामुळे हे काम राहिले होते, पण आता हे काम होईल, असा विश्वासही सावंत यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, या मुद्द्यावरुन आता सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.