मुंबई (प्रतिनिधी) : क्रिकेट रसिकांना उत्सुकता लागून राहिलेल्या यंदाच्या आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या आज (रविवार) झालेल्या बैठकीत विवो इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ९ एप्रिलपासून सुरू होणारे आयपीएलचे सामने अहमदाबाद, बेंगलुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत.

चेन्नई येथे ९ एप्रिल २०२१ रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. तर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर प्ले ऑफचे तसेच ३० मे २०२१ रोजी अंतिम फेरीचे सामने होतील.

प्रत्येक संघ लीगच्या टप्प्यात चार ठिकाणी सामना खेळेल. ५६ लीग सामन्यांपैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगलुरू येथे प्रत्येकी १० सामने तर अहमदाबाद व दिल्ली येथे प्रत्येकी ८ सामने खेळले जातील. यंदाच्या आयपीएलचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर सामना खेळणार नाही. लीगच्या टप्प्यात सर्व संघ ६ पैकी ४ ठिकाणी खेळतील.