शिये ग्रामपंचायतीची बदनामी करणाऱ्या शेतकरी संघटनेची चौकशी करा : सर्व पक्षीयांची मागणी

0
516

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या काही महिन्यांपासून रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करवीर तालुक्यातील शिये ग्रामपंचायत व प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरून बदनामी करणाऱ्या कार्यकर्त्यांची चौकशी करावी, अशी मागणी शिये गावचे सरपंच रेखा जाधव यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना आज (गुरूवार) देण्यात आले.

करवीर तालुक्यातील शिये  येथील गावठाण सर्वे नंबर २५९ व २८३ मध्ये अनेक पूरग्रस्तांना प्लॉट मिळाले आहेत. सदर प्लॉट वरती बांधकाम करण्यासाठी अथवा इतर कामासाठी जागा मालक हे पाया काढणे किंवा शौचालय बांधकामासाठी उत्खनन करत आहेत. असे असताना प्रसिद्धीच्या हव्यासापोटी शेतकरी संघटनेचे माणिक शिंदे व त्यांचे सहकारी मात्र बांधकामाला विरोध करून मुख्य पाया काढताना निघणारा मुरूम इतरत्र हलवताना सदर कामापायी तलाठी, ग्रामविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, कोतवाल यांना वेठीस धरून कामे बंद पडत आहेत.

तसेच माहिती अधिकाराचा दुरुपयोग करून अधिकाऱ्यांना त्रास देणे. व मुरूम जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन टाकणे, अशी कृत्ये करून प्रसारमाध्यमाद्वारे ग्रामपंचायत व प्रशासकीय यंत्रणेची बदनामी करत आहेत. त्यांच्या सततच्या प्रकारामुळे नागरिक, ग्रामपंचायत व अधिकारी त्रस्त झाले आहेत. प्रत्यक्षात आमच्या गावात असलेले ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, आरोग्य कर्मचारी हे कोरोना काळात, महापूर काळात प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी व जनता त्यांच्या कामावर समाधानी आहे. तर माणिक शिंदे आपल्या व्यावसायिक कौशल्याचा वापर करून व शिये ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा गट पराभूत झाल्याच्या नैराश्यातून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून भडकविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या प्रकराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी उपसरपंच शिवाजी गाडवे, माजी जि. प. सदस्य बाजीराव पाटील, माजी सरपंच रणजित कदम, माजी पंचायत समिती सदस्य जयसिंग काशीद, ग्रा. पं. सदस्य विलास गुरव, तेजस्विनी पाटील, पूनम सातपुते, मंगल कांबळे, कृष्णात चौगुले, प्रभाकर काशीद, बाबासो बुवा, जयसिंग फडतारे, निलेश कदम, निलेश कांबळे, मच्छिंद्र मगदूम, शिवाजी रानगे, अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.