कोल्हापूर (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु प्रकल्प १ सप्टेंबरला रात्री फुटला होता. हे धरण कोणत्या कारणाने फुटले याची सखोल चौकशी व्हावी, या धरणावर गेले कित्येक दिवस चौकीदार नव्हता हा चौकीदार कोठे होता, याची देखील चौकशी व्हावी, भविष्यातील पाण्याची उपयुक्तता लक्षात घेऊन पुन्हा नव्याने धरण बांधणीसाठी प्लॅन तयार करून संबंधित विभागाकडे त्वरित मंजुरीसाठी पाठवावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे ई मेलद्वारे केली आहे.

पाटील यांनी म्हटले आहे की, धरणासारख्या संवेदनशील परिसरासाठी प्रशासनाच्यावतीने हलगर्जीपणा दिसून आला. ४ वर्षांपासून तलावाच्या जॅकवेलसह विरुद्ध बाजूलाही गळती सुरू असून गेल्या २ ते ३ महिन्यापासून देखरेखीसाठी साधा वॉचमनही याठिकाणी उपस्थित नाही. त्यामुळे धरण परिसर क्षेत्रात कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचे दिसून येत आहे.

धरणफुटीमुळे शेतजमीन नापीक झाली असून अशी जमीन पुन्हा उपयोगात आणण्यासाठी सरकारकडून एकरी १ लाख अनुदान मिळावे, धरण परिसरातील नागरिकांचे नुकसान झाल्यामुळे वीजबिल माफ करावे, वाहून गेलेल्या मोटर व पाईपलाईनची भरपाई द्यावी. तरी झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित देऊन  शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.