भोसरी भूखंड प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचीही चौकशी करा..!

0
58

पुणे (प्रतिनिधी) : पुणे येथील भोसरीमधील कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साक्षीदार म्हणून जबाब नोंदवून घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर दमानिया यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फडणवीस यांचाही जबाब घ्यावा, अशी न्यायालयात मागणी केली आहे. खडसे यांच्या बैठकीतील सगळे पुरावे- मिनिट्स ऑफ मीटिंग रद्द करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, असा आरोप दमानिया यांनी केला आहे. तर, कोणत्या नियमाच्या आधारे मिनिट्स ऑफ मिटिंग रद्द केले जाऊ शकतात?, असा सवालही दमानिया यांनी केला आहे. ही संपू्र्ण प्रक्रिया शंकास्पद आहे. कोणाचे जबाब घेणे कायद्याच्या दृष्टीने आवश्यक असल्याची यादी त्यांनी न्यायालयात सादर केली आहे.