कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘कलानगरी’ कोल्हापुरात नाट्यकला सादर करण्याची संधी मिळणे ही गौरवाची बाब आहे. या नाट्यस्पर्धेच्या माध्यमातून प्रकाशदूतांच्या अंगभूत कलेचा अविष्कार होत असल्याचे प्रतिपादन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले. महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धा २०२२-२३ ‘नाट्यरंजन’चे उदघाटन दि. १० नोव्हेंबर रोजी नाळे यांचे हस्ते झाले.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित या दोन दिवशीय नाट्यस्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मंचावर मुख्य अभियंता. विजय भटकर (रत्नागिरी), सचिन तालेवार (पुणे), सुनील देशपांडे (चंद्रपूर), दत्तात्रय पडळकर (नांदेड), आयोजक तथा मुख्य अभियंता परेश भागवत, मुख्य समन्वयक तथा मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके (सांघिक कार्यालय), महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे (सांघिक कार्यालय), मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे (सांघिक कार्यालय, प्रकाशगड) यांची प्रमुख उपस्थिती होती.

संजय ढोके यांनी वीज ग्राहकांच्या सेवेत व्यस्त कर्मचाऱ्यांना तणावमुक्त होता यावे, हा स्पर्धा आयोजनाचा हेतू असल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविकात भागवत यांनी कोल्हापूरच्या कला-संस्कृतीच्या इतिहासाचा विशेष उल्लेख केला. सूत्रसंचालन उपकार्यकरी अभियंता मुकुंद आंबी यांनी केले आहे. अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी आभार मानले.

उदघाटन झाल्यानंतर पहिल्या सत्रात प्र.ल. मयेकर लिखित ‘तो परत आलाय’ हे नाटक चंद्रपूर परिमंडळ नाट्यसंघाने सादर केले. उद्या सकाळच्या सत्रात सकाळी १० वाजता अभिजित वाईकर लिखित ‘नजरकैद’ व दुपारच्या सत्रात २.३० वाजता प्र. ल. मयेकर लिखित ‘सवाल अंधाराचा’ ही नाटके सादर होतील.