औरंगाबाद (प्रतिनिधी) : अंमली पदार्थांच्या  कारवाईवरून राज्याला बदनाम  करण्याचा  डाव  आखला जात आहे.  २५ कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’  पकडण्याची मोठी कामगिरी करूनही  दखल घेतली जात नाही. महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीला डावलण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) येथे दिला. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या  नूतन इमारत लोकार्पण  कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले  की,  अंमली पदार्थांच्या आडून अशी वातावरणनिर्मिती करून महाराष्ट्राच्या ख्यातीला बदनाम करण्याचा हा डाव आहे. जगातील अमली पदार्थ जणू काही महाराष्ट्रातच तयार होत आहेत. ते पकडण्याची कामगिरी फक्त विशेष चमूच पार पाडू शकतो, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.  मात्र, हा महाराष्ट्र बोलघेवड्यांचे राज्य नाही. येथे जे बोलले जाते ते करूनही दाखवले जाते. अंमली पदार्थांच्या धाडीवरून विशेष चमूचे विशेष कौतुक होत आहे. कारण त्यात ‘हिरो’ होते आणि त्यामुळे या विशेष चमूलाही प्रसिद्धी मिळाली, असेही ते म्हणाले.