कोल्हापूर : शहरातील झालेल्या राड्यानंतर संवेदनशील भागात पुढील 31 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कुठल्याही अफवा, चुकीच्या गोष्टी आणि तत्सम बातम्या व्हॉटस्अपवरुन किंवा सोशल मीडियावरुन व्हायरल होऊ नयेत यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी सात तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये बुधवार दुपारपासून राडा सुरू झाला होता. आता परिस्थिती नियंत्रणात आटोक्यात आली आहे.
कोल्हापुरात शिवाजी चौक परिसराला लागून असलेला कोल्हापूर महापालिकेच्या भाग, गंजी गल्ली, महाद्वार रोड, अकबर मोहल्ला तसेच शिवाजी रोड आदी ठिकाणी तोडफोडीच्या घटना समोर आल्या. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. मात्र पोलिसांनी बळाचा आणि संयमाचा उत्कृष्टपणे वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दुपारी साडेबारापर्यंत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आली होती. मात्र, त्यानंतर दबा धरुन बसलेले तरुण पुन्हा एकदा रस्त्यावर आल्याने पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.