कागल (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू आणि कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबत हिचा शाहूग्रुप मार्फत शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्रोएशिया येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात भारतासाठी सुवर्ण पदक मिळवून देऊन टोकियो २०२१ ऑलिंपिक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तिचा हा सत्कार करण्यात आला.

राहीने २०१९ साली जर्मनी येथे २००८ साली पुणे येथील कॉमन गेम्स आणि २०१८ साली जकार्ता येथे एशिया गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने विविध पदकांना गवसणी घातली आहे. तिच्या या उज्वल कामगिरीबद्दल क्रीडाक्षेत्रातील प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात आले आहे. राही सरनोबतचा शाहूग्रुप मार्फत सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच न्यूज १८ लोकमतचे कोल्हापूर प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांची टीव्ही ९ या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या दिल्ली येथील चीफ ब्युरोपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की, राहीने नेमबाजीतील उज्वल कामगिरीच्या जोरावर कोल्हापूरचे नाव उंचावले आहे. याचा कोल्हापूरकरांना सार्थ अभिमान आहे. तिला पुढील ऑलिम्पिक स्पर्धेसाठी शाहूग्रुपसह तमाम कोल्हापूरवासियांच्यावतीने शुभेच्छा देतो. यासाठी ती घेत असलेले कष्ट व करत असलेली मेहनत पाहता या पदकाला गवसणी घातल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.

राही सरनोबत म्हणाली की, राजर्षि  छत्रपती शाहू महाराज यांनी खेळाडूंना राजाश्रय दिला होता. त्यांच्या पश्चात शाहू कारखान्याचे संस्थापक व राजे विक्रमसिंह घाटगे यांनी खेळाडूंना राजाश्रय देण्याची सुरू केलेली परंपरा समरजितसिंह घाटगे पुढे चालवित आहेत. राजर्षि   शाहूंच्या जन्मभूमीत झालेला हा सत्कार माझ्यासाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

यावेळी आदित्य सरनोबत, धनश्री सरनोबत, इशितादेवी मोहिते-पाटील, वीरेंद्र माने आदी उपस्थित होते.