जिल्हा परिषदेत आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन

0
45

कोल्हापूर (प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषदेत आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी माहिती अधिकाराचे कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत चर्चासत्राचे आयोजन हे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. जि.प.मधील सर्व जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चासत्र झाले. चर्चासत्रात माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी व त्यानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या अडचणीबाबत विस्तृत चर्चा झाली.

शिवाजी विद्यापीठामध्ये वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागातील विद्यार्थ्यांकरिता माहिती अधिकार या विषयावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांचे व्याख्यान झाले. वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागातील विद्यार्थी त्यांच्या व्यवसायाचा एक भाग म्हणून सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहणार आहेत. माहिती अधिकाराचा वापर हा प्राधान्याने सर्वसामान्याकरिता असून, अजूनही म्हणाव्या तितक्या प्रमाणात त्याचा वापर त्यांच्याकडून होत नाही. त्यामुळे वृत्तपत्रविद्या व जनसंवाद या विषयाच्या विद्यार्थ्यांमार्फत माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदीबाबत सर्व सामान्यांमध्ये जाणीव जागृती करण्याकरिता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याबाबत विद्यापीठाने सकारात्मक प्रतिसाद दिला. माहिती अधिकार या कायद्याविषयी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊन शंकाचे निरसन केले. शिवाजी विद्यापीठामधील वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पोवार व सहायक प्रा. डॉ. शिवाजी जाधव यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.