गारगोटी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. याच्या निषेधार्थ  भुदरगड तालुक्यात आ. प्रकाश आबिटकर यांच्या नेवृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी ना. राणे यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालण्यात आला. तसेच या प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी शिवसेनेतर्फे जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी, ज्या नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले त्या राणेंनी शिवसेना पक्षात राहून पक्ष गिळण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस, स्वाभिमानी पक्षात रमून झाल्यावर आता राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल राणे यांनी कितीही आक्षेपार्ह बोलण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील शिवसैनिक त्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अर्जुन आबिटकर म्हणाले, गेल्या चार दिवसांपासून भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेच्या नावाखाली नारायण राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक संतापले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे सांगितले.

यावेळी माजी उपसभापती सुनिल निंबाळकर, मौनी विद्यापीठाचे संचालक बाजीराव चव्हाण शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, अरुण शिंदे, ग्रा.पं. सदस्य रणधिर शिंदे, संग्रामसिंह सावंत, महादेव पाटील, तानाजी देसाई, अशोक दाभोळे, राजू चिले, अजित चौगले आदी उपस्थित होते.