बोरपाडळे (प्रतिनिधी) : लॉकडाऊन काळात  वीज वापर न करताही भरमसाट बिले आकारून ती भरण्याबाबतचा आदेश सरकारने काढला आहे. याबाबत नागरिकांमध्ये  तीव्र भावना आहेत. सरकारच्या या आदेशाविरोधात नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा  भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला.

घाटगे यांनी जनपंचायत शिवारसंवाद अंतर्गत पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील सातवे व थेरगाव येथील शेतकऱ्यांशी  बांधावर संवाद साधत अडी-अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर शहापूर  (ता.पन्हाळा) येथील मोरे परिवाराला सदिछा भेट दिली. त्यानंतर  त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी वाढीव वीजबिले, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतक-यांना ५० हजारपर्यंत अनुदान व मायक्रोफायनान्सच्या मनमानी वसुलीबाबत कडक कायदा करण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले.  परंतु याबाबत कोणतीही कारवाई न केल्याबाबत राज्य सरकारविषयी लोकांच्यामध्ये नाराजी आहे.  या आंदोलनात शेतकऱ्यासोबत आपण स्वतः रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी घाटगे यांच्याहस्ते सदाशिव सोळसे, नितीन पाटील, संजय पाटील, श्रीकांत कुंभार, कृष्णात जाधव, कृष्णात हिरवे, राजकुमार जाधव, अनिल एच.मोरे या पत्रकारांचा कोरोना काळातील कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. भगवान काटे, सचिन शिपुगडे, डॉ.कृष्णात पाटील, उमेश तेलवेकर आदी उपस्थित होते.