कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने जिल्ह्यातील सर्वच गटसचिवांना जीवन विमा व वैद्यकीय विमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १८६० संस्थाकडील कार्यरत सर्वच म्हणजे १०२१ गटसचिवांचा समावेश या योजनेत केला आहे. दुर्दैवाने कोरोनासह अन्य कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून पाच लाखांचा विमा व कोरोनासह अन्य कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी  आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीकडून दोन लाख रुपयांचा वैद्यकीय विमा, असे या योजनेचे स्वरूप आहे.

बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गट सचिवांची जोखीम लक्षात घेऊन गटसचिवांनाही आयुर्विमा व वैद्यकीय विमा योजना लागू करण्यासंदर्भात दवाखान्यातून पत्र लिहून संचालक मंडळाला सूचना केली होती. त्यानुसार ज्येष्ठ संचालक पी. जी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या गटसचिवांच्या वारसांना सानुग्राह धनादेश देण्यात आले.

गेल्यावर्षी बँकेने कर्ज माफीचे कामकाज गट सचिवांनी उत्कृष्ट केल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच गट सचिवांना एक पगार बक्षीस म्हणून दिला आहे. त्यालाही अद्याप सहकार खात्याची मान्यता मिळालेली नाही. तसेच या दोन्ही विमा योजनेत बँकेने केडरच्या बरोबरीने निम्मा हिस्सा उचलण्याचे ठरवले आहे. त्यानुसार बँक २८ लाखांचा भार उचलणार आहे. या योजनेत बँकेच्या हिश्यापोटी दिलेल्या रकमेला जिल्हा सहकार उपनिबंधकानी सहकार खात्याची मान्यता घेण्याची ग्वाही बैठकीत दिली आहे.

या बैठकीला राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. पी. एन. पाटील, आ, राजेश पाटील, आ. राजूबाबा आवळे, प्रताप उर्फ भैय्या माने, संतोष पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, असिफ फरास,  विलासराव गाताडे, अनिल पाटील, सर्जेराव पाटील-पेरीडकर, आर.के.पवार, उदयानीदेवी साळुंखे, सुनील नागावकर, महेश गुरव, सहकार जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने आदी उपस्थित होते.