काँग्रेस, राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान : धनंजय महाडिक

0
39

कोल्हापूर : घटनात्मक आणि संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करूनच राहुल गांधी यांना दोषी ठरवण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. या निकालाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार राज्य घटनेने राहुल गांधींना दिला असताना, न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन करून, त्यांनी आणि काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचा अवमान केला आहे, अशी टीका भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे.

न्यायालयाच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने आंदोलन सुरु केले आहे. काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी राहुल गांधी यांना दोषी ठरवणार्‍या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पत्रके काढत आहेत. न्यायालयाच्या निर्णयावर टीका करणे, न्यायालयाच्या निर्णयाचा जाहीर निषेध करणे हा डॉ. आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेचा अवमान आहे. राहुल गांधी यांना न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. हा अधिकार न वापरता, न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करून, काँग्रेस नेते न्याययंत्रणेला आपण कवडीचीही किंमत देत नसल्याचे दाखवून देत आहेत, असे महाडिक यांनी म्हटले आहे.

जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या नेत्यांना तुरुंगात डांबणार्‍या काँग्रेसने लोकशाहीच्या नावाने गळा काढावा, याचे आश्चर्य वाटते. कोणाचीही विनाकारण बदनामी करण्याचा अधिकार राहुल गांधींना नाही, हेच न्यायालयाच्या निर्णयातून दिसले आहे, असेही खासदार महाडिक यांनी म्हटले आहे.