पुणे (प्रतिनिधी) : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावरून मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून जोरदार राडा घातला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत चार आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद जगभरात उमटू लागले असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांना स्मार्ट वॉच आणि स्पोर्ट्स सायकल वाटप, ग्रामरक्षक दलाच्या शुभारंभ प्रसंगी अजित पवार बोलत होते.

ते म्हणाले की, अमेरिकेतील घटना निंदनीय असून याचा धिक्कार केला पाहिजे. प्रत्येकाची वेगवेगळी मते, विचार असू शकतात. सर्वांचे एकाचेच विचार पटतील असे नाही. त्यालाच आपण लोकशाही म्हणतो. परंतु तिथे निवडणूक सुरू होती आणि निकाल लागला तेव्हापासूनच ऐकायला मिळत होते, की ट्रम्प यांना निकालच मान्य नाही. मतमोजणीला मानत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. पण आपण त्याबाबत फार चर्चा करण्यापेक्षा आपल्या समस्यांना आणि प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे.