मनमाड (प्रतिनिधी) :  गणेश मंडळाकडून प्रत्येक वर्षी श्री गणेशाची स्थापना चक्क मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस रेल्वेमध्ये केली जाते. यंदाही गणेश भक्तांनी श्री गणरायाची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात केली आहे.

मनमाड रेल्वे जंक्शन हे देशाचे मध्यवर्ती रेल्वे जंक्शन असून, या रेल्वे स्थानकातून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असतात. गणेशोत्सवाच्या काळामध्ये चक्क श्री गणेश मनमाड ते मुंबई ते मनमाड असा प्रवास तब्बल दहा दिवस करीत असतो. देशातील असा एकमेव गणपती बाप्पा आहे की जो रोज प्रवास करतो.

आकर्षकपणे सजवलेली रेल्वेगाडी त्यात श्रींची स्थापना, धार्मिक विधी, आरती आणि त्यानंतर ढोल ताशाच्या गजरामध्ये कार्यकर्त्यांनी मनसोक्त आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला. ही परंपरा तब्बल २५ वर्षांपासून असून, ही आगळीवेगळी परंपरा यंदा २६ व्या वर्षीही गोदावरी एक्सप्रेसच्या प्रवाशांनी अबाधित राखली आहे. दोन वर्षांमध्ये कोविडच्या काळामध्ये रेल्वे प्रवासी गाड्या बंद असताना कुठल्याही प्रकारचा खंड पडू न देता प्रवाशांनी श्री गणेशाची स्थापना केली होती.

यंदाच्या वर्षी गणेशोत्सव हा निर्बंधमुक्त जाहीर झाल्यानंतर प्रवाशांनी गोदावरीच्या पदाधिकाऱ्यांनी पूजा अर्चा करून श्री गणेशाची स्थापना मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये केली. आश्चर्यजनक म्हणजे चाकरमान्यांनी सुरू केलेली परंपरा चाकरमान्यांबरोबर चक्क श्री गणेश मोठ्या उत्साहात प्रवास करत असतो. या प्रवासादरम्यान प्रत्येक स्थानकावर बाप्पाची आरती आणि पूजाही केली जाते. ही या मनमाड-कुर्ला गोदावरी गणेशाचे खास वैशिष्ट्य आहेत.