कसबा बावड्यातील कचरा घोटाळ्याची चौकशी सुरू : डॉ. कादंबरी बलकवडे

0
21

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपने गेल्या आठवड्यात उघडकीस आणलेल्या कोल्हापूर महापालिकेतील कचरा घोटाळ्याची चौकशी सुरू केल्याची माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला आज (शुक्रवार) दिली.

या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीत उपयुक्त रविकांत अडसूळ आणि सहाय्यक आयुक्त नितीन घार्गे यांचा समावेश केला आहे. तसेच चौकशी समितीच्या अहवालात भाजपच्या कार्यकर्त्याना तक्रारदार म्हणून सहभागी करून घेण्याचे तसेच भाजपने दिलेल्या व्हिडिओ व फोटोंचा समावेश करून घेण्याचेही बलकवडे यांनी  यावेळी मान्य केले.

कोल्हापूर महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पावरील वर्षानुवर्षे पडून राहिलेला सुमारे एक लाख टन कचरा कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना आणि पर्यावरणाची कोणतीही काळजी न घेता कसबा बावडा परिसरातील काही शेतांमध्ये उघड्यावर टाकण्यात आल्याची बाब भाजपच्या कसबा बावडा मंडलाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आली होती. त्यानंतर शेतात कचरा परसरण्याचा प्रकार थांबला असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेवरील कारवाईसाठी आपला अहवाल मुंबई कार्यालयास पाठविला आहे.

यावेळी चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, अजित ठाणेकर व विजयसिंह खाडे-पाटील यांनी प्रशासकांना तेथे घडणाऱ्या विविध आर्थिक घोटाळ्यांबाबत माहिती दिली. तसेच महापालिकेचा महसूल बुडवून आपले उखळ पांढरे करणाऱ्या टोळीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.