शेळोली येथे गवा रेड्याच्या हल्ल्यातील जखमीचा मृत्यू…       

0
251

कडगाव (प्रतिनिधी) : शेळोलीतील शेतकरी शिवाजी सावंत हे आपल्या शेतात गेले असता अचानक आलेल्या गवा रेड्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी  कोल्हापूर येथे दाखल केले होते. गव्याचे शिंग त्यांच्या पोटात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. शिवाजी सावंत यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वेंगरूळ शेळोली येथे जंगलामध्ये गव्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असून पंधरा दिवसांपूर्वीच वेंगरूळ येथील शेतकरी सदाशिव खेतल यांच्यावर देखील गव्याने जीवघेणा हल्ला केला होता. गेल्या महिनाभरामध्ये दोन घटना घडल्याने येथील शेतकऱ्यांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. गव्यामुळे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

तेंव्हा वन विभागाने यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच वनविभागाने तातडीने त्यांच्या कुटुंबियांना मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.