मुंबई (प्रतिनिधी) : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटकं सापडल्याचं आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण राज्यात चांगलंच गाजते आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्यानंतर आता हे प्रकरण हक्कभंगापर्यंत पोहोचलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी “देवेंद्र फडणवीसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला”, असा दावा केल्यानंतर विधानसभेत गदारोळ झाला. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांच्या विरोधात हक्कभंग आणला आहे. त्यासोबतच, मराठा आरक्षणावरून दिशाभूल करण्याचा आरोप करत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात देखील फडणवीस यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे.

विधानभवनाबाहेर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक प्रकरणात काल काही आरोप केले होते. मात्र, प्रथमदर्शनी या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार दिसून येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा अभिप्राय आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. शिवाय ही बाब आपण काल निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा ते वारंवार तेच बोलत राहिले. असे करून अनिल देशमुख यांनी माझ्या बोलण्यावर बंधने आणून माझा विशेषाधिकार भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी मी सभागृहात केली आहे”.

अशोक चव्हाण यांच्याविरोधात देखील देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंगाची नोटीस बजावली आहे. “मराठा आरक्षणावर अशोक चव्हाण यांनी अतिशय दिशाभूल करणारे निवेदन सभागृहात केले. १०२ व्या घटनादुरुस्तीचा उल्लेख हा सर्वोच्च न्यायालयात मुकुल रोहतगी यांनी केला होता. केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल यांनी जे सांगितले नाही, ते त्यांनी सभागृहात सांगितले. १०२ व्या घटनादुरुस्तीचा महाराष्ट्राच्या कायद्यावर परिणाम होणार नाही, हे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. मात्र या सर्व बाबी विचारात न घेता अशोक चव्हाण महाराष्ट्राची आणि मराठा समाजाची दिशाभूल करताना स्वतःच्या अज्ञानाचे प्रदर्शन करीत आहेत. त्यामुळे याबाबत मी त्यांच्याविरुद्ध हक्क भंगाची नोटीस बजावली आहे.