लवकरच वृत्तवाहिन्यांसाठी नियमावली : प्रकाश जावडेकर

0
60

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार वृत्तवाहिन्यांसाठी नियमावली जारी करण्याचा आणि नियामक यंत्रणाही बळकट करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये कामामध्ये हस्तक्षेप करणे किंवा त्यांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्याचा उद्देश नाही, मात्र, वृत्तवाहिन्यांवर देखरेख ठेवण्याची गरज आहे,असे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

एका वेबिनारमध्ये जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली. सध्या प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा चर्चेत येत आहे. काही वृत्तवाहिन्यांवर कसलेच बंधन नाही. प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) ही वृत्तपत्र नियमन करणारी यंत्रणा आहे. त्यात वृत्तपत्र मालक, संपादक, पत्रकार, छायाचित्रकार आणि जनतेचे प्रतिनिधी आहेत. मात्र, वृत्तवाहिन्यांबाबत अशी यंत्रणा नाही. अशा यंत्रणेची मागणी होत असल्याने त्याबाबत विचार केला जात आहे. वृत्तवाहिन्यांवरील वृत्ताचे नियमन करण्यासाठी प्रेस कौन्सिलसारख्या संस्था नाहीत. त्यामुळे काही वाहिन्यांवर कोणतेही बंधन नाही. या माध्यमांची जनतेपर्यंत पोहचण्याची ताकद आहे. त्यामुळे जनतेपर्यंत अयोग्य आणि दिशाभूल करणारे वृत्त पोहचू नये, यासाठी योग्य व्यवस्था अस्तित्वात आणण्याची गरज जावडेकर यांनी व्यक्त केली.

डिजिटल आणि ओटीटी प्लॅटफॉर्मबाबतही अशीच समस्या आहे. टीव्ही रेटिंग यंत्रणा बळकट करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय विचार करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.