इंधन दरवाढीने महागाईचा आगडोंब : जनता त्रस्त

0
144

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पेट्रोल, डिझेलचा दर रोज वाढत असल्याने महागाईचा आगडोंब उसळला आहे. सध्या शहर आणि जिल्ह्यात पेट्रोलचा प्रति लिटरचा दर ९४ रुपये २० पैसे तर डिझेलचा दर ८३ रूपये ३१ पैसे झाला आहे. यामुळे गरीब, सामान्य, मध्यमवर्गीयांना प्रचंड आर्थिक फटका बसत आहे. परिणामी अच्छे दिनची स्वप्ने दाखवत केंद्रात सत्तेवर आलेल्या सरकार विरोधात असंतोष वाढतो आहे.

कोरोना महामारीने गरीब, सामान्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योग, व्यवसाय डबघाईला आले आहेत. अशा परिस्थितीमध्येच इंधन, गॅसचे दर झपाट्याने वाढत आहेत. यामुळे गरिबांचं जगणंच मुश्कील झाले आहे. आर्थिक ओढाताण सहन करावी लागत आहे. इंधनाचे दर अलीकडे रोज वाढत आहेत. काही दिवसांतच पेट्रोल शंभरीला पोहचेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सामान्य वाहनधारकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गॅस सिलिंडर दर ७०० वर गेला आहे. याचा परिणाम ग्रामीण भागात दिसत आहेत. अनेक गृहिणी गॅस सिलिंडरला पैसे देणे शक्य नसल्याने पुन्हा चूल पेटवणे पसंत करीत आहेत.