कसबा बावड्यातील निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम नागरिकांनी पाडले बंद…

0
52

कसबा बावडा (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील दत्त कॉलनीत रस्तेबांधणी बांधणीचे निकृष्ट दर्जाचे काम  संतप्त नागरिकांनी शनिवारी बंद पाडले. रस्ते बांधणीसाठी नियमानुसार खडीचे स्तर न टाकता एकच शेवटचा डांबरीचा स्तर टाकून घाईगडबडीत रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून सुरू होता. नियमानुसार रस्ता होत नसल्याचे नागरिकांच्या ध्यानात आल्यानंतर ठेकेदारास याबाबत विचारले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नियमानुसारच रस्ता होत असल्याचे सांगितले. मात्र, कोणत्याही स्थितीत अशा पद्धतीने काम पूर्ण करायचे नाही, असे सांगत नागरिकांनी काम थांबवले.

या निकृष्ट कामाचा व्हिडिओ आणि फोटो महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना सोशल मीडियावरून नागरिकांनी पाठवला. याची गंभीर दखल घेत, देसाई यांनी कनिष्ठ अभियंता मीरा नगीमे यांना घटनास्थळी पाचारण केले. रस्ते बांधणीचे काम निकृष्ट असून निविदेतील नियमाप्रमाणे काम होत नसल्याचे नगीमे यांच्या ध्यानात आले. त्यांनी याबाबत ठेकेदाराला बोलावून घेऊन स्पष्ट शब्दात सुनावले.#

आमदार ऋतुराज पाटील यांनीही याची दाखल घेत संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराला याबाबत कडक शब्दात सुनावले. निविदेत ठरल्याप्रमाणे दोन-तीन प्रकारचे लेअर टाकून रस्तेबांधणी न करता घाईगडबडीत एकच लेअर टाकून रस्त्याचे काम उरकणे सुरू आहे. कसबा बावड्यातील पाडळकर कॉलनी येथेही अशाच पद्धतीचे निकृष्ट दर्जाचे काम सुरू होते. महापालिकेने याची दखल घेतली नाही. त्यामुळेच ठेकेदाराने आठ दिवसात शेजारी कॉलनीत तसाच प्रकार केला. रस्ते बांधण्याच्या कामावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून काम दर्जेदार व्हावे, तसेच आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दर्जेदार कामासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.