जमशेदपूर (वृत्तसंस्था) : स्टील मॅन ऑफ इंडिया अशी ओळख असलेले उद्योगपती पद्मविभूषण जमशेद जे. इराणी यांचे निधन झाले आहे. सोमवारी रात्री जमशेद इराणी यांनी जमशेदपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला. जमशेद इराणी हे ८५ वर्षांचे होते. गेल्या जवळपास ४ दशकांपासून ते टाटा स्टीलशी संलग्न होते.

जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या संचालक मंडळातून जमशेद इराणी सेवानिवृत्त झाले. त्यांनी १९५६ मध्ये नागपुरमधून विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर १९५७ मध्ये नागूपर विद्यापीठातून त्यांनी एमएससीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर ते जेएन टाटा स्कॉलर म्हणून ब्रिटन युनिवर्सिटी ऑफ शेफील्ड येथे गेले आणि १९६० मध्ये दव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. याशिवाय १९६३ मध्ये त्यांनी त्यांची पीएच. डी. सुद्धा पूर्ण केली होती. जमशेद इराणी यांनी टाटा स्टीलमध्ये त्यांनी ४३ वर्षे काम केले होते. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जमशेद इराणी यांच्या पश्चात त्यांची पत्नी डेझी आणि तीन मुले जुबिन, निलोफर आणि तनाझ असा परिवार आहे.