कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु यामधून औद्योगिक क्षेत्र वगळण्यात आले आहे. यामध्ये उद्योगातील कामगारांना आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याची अट घातली आहे. यामुळे पुन्हा एकदा उद्योजक आणि कामगारांच्यापुढे नवीन समस्या निर्माण झाली आहे. यामुळे कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. 

यावेळी सर्व कामगारांची आरटीपीसीआरची चाचणी वेळेत करणे शक्य होणार नाही, तसेच ही चाचणी करून घेण्यासाठी तशी मोठी यंत्रणाही नाही. त्यामुळे उद्योगांपुढे मोठी समस्या निर्माण झाली असल्याचे ना. मुश्रीफ यांना सांगितले. यावर तोडगा काढण्यासाठी ना. मुश्रीफ यांनी सोमवार (दि. १२) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित केली. या बैठकीला सर्व औद्योगिक वसाहतीतील संघटनांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे.

यावेळी सचिन मेनन, हर्षद दलाल, दिनेश बुधले, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, प्रदीप व्हरांबळे आदी उपस्थित होते.