लंडन (वृत्तसंस्था) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने चौथे सुवर्ण जिंकले आहे. पाचव्या दिवशी, भारताने महिला लॉन बॉल्सच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७-१० असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ९२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय लॉन बॉल्स महिला संघाने पदक जिंकले आहे. लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया आणि रूपा राणी टिर्की या भारतीय खेळाडूंनी सामन्यात चमकदार कामगिरी केली. कॉमनवेल्थ गेम्स १९३० मध्ये सुरू झाले. लॉन बॉल हा पहिल्याच स्पर्धेपासून राष्ट्रकुलचा भाग आहे, परंतु भारतीय महिला संघाला त्यात कधीही पदक जिंकता आले नव्हते. नवी दिल्ली येथे २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघ प्रथमच लॉन बॉलसाठी पात्र ठरले होते.

भारतीय लॉन्ग जंपर श्रीशंकर मुरली आणि मोहम्मद अनीस हे अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तसेच शॉटपुट महिलांमध्येही मनप्रीतने पदक फेरी गाठली आहे.पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेच्या पात्रता फेरीत केरळच्या श्रीशंकरने पहिल्या उडीत ८.०५ मीटर उडी मारून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याच वेळी, मोहम्मद अनीसने ७.६८मीटरच्या उडीसह ८ वे स्थान मिळवून अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. तसेच शॉटपुटर मनप्रीतने १६.९८ मीटरसह ७ वे स्थान पटकावले.

दुसरीकडे, महिलांच्या चार स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिकेवर ८-२ ने आघाडीवर आहे. भारतीय वेटलिफ्टर पूनम यादव महिलांच्या ७६ किलो वजनी गटात पदक जिंकण्यापासून वंचित राहिली. तिने स्नॅचमध्ये ९८ किलो वजन उचलले. मात्र, तीन क्लीन अँड जर्क प्रयत्नांत तिला एकदाही ११६ किलो वजन उचलता आले नाही.