बर्मिंगहॅम : (वृत्तसंस्था) १५  वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले. बर्मिंगहॅम कसोटीत इंग्लंडने भारताचा सात गडी राखून पराभव केला. इंग्लंडच्या फलंदाजांनी आपल्या दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करत शानदार विजय मिळवला. इंग्लंडच्या वतीने हा आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला.

उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या जो रूट (नाबाद १४२) आणि जॉनी बेअरस्टो (नाबाद ११४ ) यांच्यातील चौथ्या विकेटसाठी केलेल्या २६९ धावांच्या भागीदारीमुळे इंग्लंडने ३७८ धावांचे लक्ष्य तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यासह पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी झाली आहे.

ऐतिहासिक विजय मिळवण्याची संधी असलेला सामना कसा गमवायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाने खेळलेला इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना होय. भारताने विरोधी संघाला ३५० हून अधिक धावांचे लक्ष्य दिले आणि तरीही सामना गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. जो रूटने पाचव्या दिवशी कसोटी कारकिर्दीतील २८ वे शतक झळकावले. २०२१ नंतर इंग्लंडच्या या फलंदाजाने ४७  डावांत ११ शतके ठोकली आहेत. भारताविरुद्ध रुटचे ९ वे शतक होते. भारतीय संघ दुसऱ्या डावात २४५ धावांत ऑलआऊट झाला आणि इंग्लंडला ३७८ धावांचे लक्ष्य मिळाले.

लक्ष्य मोठे आहे असे वाटले, पण भारतीय गोलंदाजांची इंग्लंडच्या सलामीवीरांनी प्रथम धुलाई केली. एलेक्स लीस आणि जॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. यानंतर ३ फलंदाज २  धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतले आणि भारत सामन्यात परतल्याचे दिसत असले तरी तसे झाले नाही. जॉनी बेअरस्टो आणि जो रूटने आपल्या तडाखेबंद खेळीने सामना पूर्णपणे उलटा फिरवला.