मॉस्को: भारतीय नागरिक प्रतिभाशाली आहेत. भारतामध्ये अनेक प्रकारच्या क्षमता आहेत. विकासाच्या रूपाने त्याचे परिणाम लवकरच दिसून आल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताचे कौतुक केले. रशियाच्या एकता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भारताकडे प्रगती साधण्याच्या अनेक संधी आहेत. तब्बल १५० कोटीची लोकसंख्या हे भारताचे सर्वात मोठे बलस्थान आहे. भारतीय लोक भौतिक प्रगतीबरोबरच आंतरिक विकासासाठी सक्षम आणि सजग आहेत, असे पुतीन यांनी नमूद केले.

मागील महिन्यातही पुतीन यांनी त्यांच्या भाषणात भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली होती. भारत आणि रशियाचे संबंध वैशिष्ट्यपूर्ण आणि सौहार्दाचे आहेत. दोन्ही देश दीर्घकाळापासून एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि पुढील काळातही ते तसेच राहतील, असा विश्वास व्यक्त करतानाच पुतीन यांनी स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा अवलंब केल्याबद्दल मोदी यांचे कौतुक केले होते.