भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय : बॉर्डर-गावस्कर मालिकाही जिंकली 

0
243

ब्रिस्बेन (वृत्तसंस्था) : ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर ३ गडी राखून दणदणीत विजय मिळवत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी पटकावली. नवोदय खेळाडुंचा भरणा असलेल्या भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर ऐतिहासिक कामगिरी केली. चार कसोटी मलिकेत २-१ अशा फरकाने मालिका खिशात घातली.

भारतापुढे विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष होते. ते भारताने ७ विकेट्सच्या बदल्यात पूर्ण केले. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घराच्या मैदानावर पराभवाची धूळ चारली.

सलामीवीर रोहित शर्मा ७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर युवा फलंदाज शुभमन गिलने ९१ धावांची खेळी करत संघाला विजयाकडे नेले. त्याला चेतेश्वर पुजाराची भक्कम साथ मिळाली. कर्णधार अजिंक्य रहाणेने २४ धावा केल्या. रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरने दमदार फलंदाजी करत भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. जिंकण्यासाठी १० धावांची गरज असताना सुंदर २२ धावावर बाद झाला.  विजयासाठी ३ धावांची आवश्यकता असताना शार्दुल ठाकूर २ धावा करून तंबूत  परतला. ८९ धावांची निर्णायक खेळी करत रिषभ पंतने चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केले.