कोल्हापूरच्या अपक्ष आमदाराचा ठाकरे सरकारला इशारा

0
1945

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वस्त्रोद्योगासह लघु उद्योगाचे प्रलंबित प्रश्न ठाकरे सरकारने १५ जानेवारीपर्यंत मार्गी लावावेत, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल, असा इशारा इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला. प्रकाश आवाडे यांनी आज इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशनमध्ये शहरातील सर्व यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलवली होती. या बैठकीत त्यांनी हा इशारा दिला.

 

दोनच दिवसांपूर्वी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात आवाडे कुटुंबाची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच आवाडे यांनी सरकार विरोधात दंड थोपटले आहेत. ते म्हणाले, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, पालकमंत्री सतेज पाटील, अर्थमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळोवेळी पत्राद्वारे वा प्रत्यक्ष भेटून वस्त्रोद्योगाच्या समस्या सांगितल्या आहेत. त्यावर बैठक घेण्याचे केवळ आश्वासन दिले जाते, मात्र बैठक घेतली जात नसल्याने आता राज्य सरकार हा उद्योग वाचवण्यासाठी काही करेल असे वाटत नाही. मागील पाच वर्षांपासून संपूर्ण वस्त्रोद्योग आर्थिक संकटातून जात आहे. चार वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने वीज दरात सवलतींसह विविध योजना जाहीर केल्या होत्या. परंतु आजतागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. विद्यमान सरकारकडूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आपल्या मागण्या पदरात पाडून घ्यायच्या असतील तर केवळ चर्चा न करता सर्वांनी एकजुटीने लढ्यात सहभागी व्हायले पाहिजे.