कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर आणि मृत्युदर कमी होण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार करावा. चांगले काम करीत असलेल्या ग्रामसमित्या आणि सरपंच यांचे अनुकरण इतर गावांनी करावे. ग्रामस्तरीय अलगिकरण कक्ष स्थापन करावेत. तसेच तपासण्या वाढवून बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळवून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. ते कोरोना नियंत्रणासाठी नियुक्त केलेल्या सर्व पथक प्रमुखांच्या व्हिसीमध्ये बोलत होते.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले की, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अँटीजन किट्सचे योग्य प्रमाणात वाटप करावे. किमान पंधरा दिवसांचा औषधांचा साठा प्रत्येक शासकीय कोविड केंद्रात असेल याप्रमाणे नियोजन करावे. औषधे शासनाकडून मागविणे किंवा स्थानिकरित्या खरेदी करणे याचे योग्य नियोजन करावे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार अंमलबजावणी करावी.

हातकणंगले, शिरोळ, करवीर अशा रुग्णदर अधिक असणाऱ्या तालुक्यातील अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध उपाययोजना राबवाव्यात. महाआयुष सर्व्हे अंतर्गत लक्षणे आढळणाऱ्या 60 वर्षावरील नागरिकांची तात्काळ तपासणी करुन घेवून बाधित नागरिकांना वेळेत उपचार मिळवून द्या.  या सर्व्हेचे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.

यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, सर्व पथक प्रमुख उपस्थित होते.