नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  देशात आर्थिक मंदीचं संकट घोंगावत असताना आरबीआयने आणखी एक धक्का दिला आहे. आरबीआयने रेपो दरात ०.५० बेसिस पॉईंटने वाढ केली असून, यामुळे कर्जाचे हप्ते महाग होणार आहेत. नवीन कर्जेदेखील महाग होणार आहेत. आरबीआयच्या व्याज दरवाढीनंतर आता व्याजदर ५.९० टक्के इतका झाला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी चलनविषयक धोरण समितीसोबत तीन दिवस बैठक घेतली होती. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आज पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला.

गेल्या वर्षभरात भारतीय रिझर्व्ह बँकेने चार वेळा रेपो रेट वाढवला आहे. याआधी ऑगस्टमध्ये रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली होती. तेव्हा ४.९० टक्क्यांवरून ५.४० टक्के करण्यात आला होता. आता हाच दर ५.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, वाढलेल्या रेपो रेटमुळे शेअर मार्केटमध्येही बँकांचे शेअर्सवरही याचा परिणाम झाला आहे.

रेपो रेट वाढीचा निर्णय तत्काळ लागू होणार असल्याचेही आरबीआयने सांगितले आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांता दास म्हणाले की, महागाईचा धोका अजूनही कायम आहे. आव्हानात्मक काळात देशाची आर्थिक स्थिती मजबूत आहे. भारताची जीडीपी वाढ सर्वोत्तम आहे. संपूर्ण जग संकटातून जात आहे. आर्थिक बाजारातील सर्वच विभागांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. सणासुदीच्या काळात मागणी वाढू शकते. ग्राहक मूल्य निर्देशांक आरबीआयच्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे एमपीसीने रेपो दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीसीच्या सहापैकी पाच सदस्यांनी रेपो दर वाढवण्याच्या बाजूने निर्णय दिला आहे. सरकारी खर्च वाढल्याने तरलता सुधारेल, असे ते म्हणाले.