कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हटस् बँकेने १०६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. सभासदांची मागणी विचारात घेऊन संचालक मंडळाने नुकताच कर्जमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकत्रित कर्जमर्यादा रु. १८ लाख इतकी करण्यात आली असून, आकस्मिक कर्जमर्यादा रु. १.५० लाख इतकी करण्यात आली आहे.

बँकेमार्फत ‘राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व ठेव’ योजना सुरु करण्यात आली असून, या ठेवीस ७.५० टक्के इतका भरघोस व्याजदर देण्यात येत आहे. या ठेव योजनेस सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

संचालक मंडळाने कर्जमर्यादमध्ये वाढ करून बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी दिलेल्या जाहिरनाम्यामधील आश्वासनांची टप्प्याटप्प्याने वचनपूर्ती करणार असल्याचे नमूद केले आहे. वाढीव कर्जमर्यादा सुविधेचा, तसेच ठेवीवर देण्यात येणाऱ्या भरघोस व्याजदराचा लाभ सर्व सभासदांनी घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष शशिकांत दिनकर तिवले व संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.