आयकर विभागातील निरीक्षकाला १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक   

0
207

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आयकर विभागाचा छापा टाळण्यासाठी एका डॉक्टरकडून १० लाखांची लाच घेताना आयकर निरीक्षकाला आज (शुक्रवार) दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लक्ष्मीपुरी परिसरातील विल्सन पुलावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. प्रताप महादेव चव्हाण (वय ३५, रा. बेलेकर मळा, पोलोग्रामजवळ ) असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नांव आहे. या कारवाईमुळे आयकर विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका होमिओपॅथी डॉक्टराविरोधात अज्ञात व्यक्तीने अवैध संपत्तीबाबत आयकर विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आयकर विभागाकडून या डॉक्टरची चौकशी सुरू होती. यादरम्यान, चव्हाण यांनी घरावर छापा टाकण्याचा इशारा डॉक्टरला दिला होता. तसेच हा छापा न टाकण्यासाठी चव्हाण यांनी डॉक्टरांना २० लाख द्यावे लागतील असे सांगितले होते. त्यानंतर प्रताप चव्हाण यांनी १४ लाखांवर तडजोड केली होती. याबाबतची माहिती डॉक्टरांनी गुरूवारी लाचलुचपत विभागाला दिली होती. त्यानुसार आज सकाळपासून विल्सन पुलाजवळ सापळा रचला होता. यावेळी डॉक्टर यांच्याकडून १० लाखांची लाच घेताना चव्हाण यांना अटक करण्यात आली.