नागपूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या काटोल येथील घरासोबतच जिल्ह्यातील त्यांच्याशी संबंधित ६ ठिकाणी आयकर विभागाने आज (शुक्रवार) सकाळी छापे टाकले. त्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आयकर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काटोलमधील त्यांच्या घरी झाडाझडती घेतली. त्याचबरोबर त्यांच्या घरासोबतच नागपूर विमानतळाजवळील त्यांचे हॉटेल, सोयाबीन केकची फॅक्टरी, एनआयटी कॉलेजमध्ये छापा टाकला. यासोबतच, त्यांच्या तीन भागीदारांपैकी काद्री आणि भटेवार यांची देखील आयकर विभागाने चौकशी सुरू केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांनंतर देशमुख अडचणीत आले आहेत. त्यांची ईडीकडून चौकशी सुरू असून त्यात आता आयकर विभागाने  कारवाई केली आहे. दरम्यान, छापा टाकण्यासाठी आयकर विभागाची पथके नागपूरमधील नसून बाहेरून आल्याचे सांगितले जात आहे.